21/08/2026
सातबारा किंवा फेरफारवरील चूक दुरुस्त करण्यासाठी आता तहसीलदार कार्यालयात वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागणार नाहीत.☺
महाराष्ट्र शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५५ (लेखन प्रमाद दुरुस्ती) बाबत अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.
अनेकदा ७/१२ वर नाव चुकणे, गट नंबरच्या अंकाची अदलाबदल होणे किंवा क्षेत्रफळ टायपिंग करताना चूक होणे अशा साध्या लेखन चुकांमुळे जमिनीचे व्यवहार अडकून पडतात. या अधिकाराचा गैरवापर टाळण्यासाठी आणि खऱ्या खातेदारांना वेळेत न्याय मिळण्यासाठी शासनाने नवे नियम लागू केले आहेत.
या नवीन शासन परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे
काय दुरुस्त होणार: खातेदाराच्या नावातील स्पेलिंगची चूक, गट नंबर किंवा सर्व्हे नंबरच्या अंकातील अदलाबदल, टायपिंगमुळे राहिलेले नाव किंवा क्षेत्रफळातील टायपिंगची चूक आता कलम १५५ अंतर्गत दुरुस्त करता येईल. मूळ हक्कात किंवा मालकीत कोणताही बदल न करता केवळ मानवी व तांत्रिक चुकाच दुरुस्त केल्या जातील.
अपील आणि दाव्यांना बंदी: ज्या प्रकरणात कलम २४७ किंवा २५७ नुसार अपील करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे कलम १५५ खाली चालवता येणार नाहीत.
५ वर्षांपेक्षा जुनी चूक असल्यास: जर महसूल नोंदीतील लेखन चूक ५ वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर आता तहसीलदारांना थेट बदल करता येणार नाही. त्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी (SDO) यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासकीय जमिनींना संरक्षण: हस्तांतरणास निर्बंध असलेल्या जमिनी, शासकीय जमिनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनींवर कलम १५५ चा गैरवापर करता येणार नाही.
जमीन खरेदी-विक्री करताना किंवा जुन्या नोंदी दुरुस्त करताना या नियमांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कायदेशीर अडथळे निर्माण होणार नाहीत.
तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या ७/१२ उताऱ्यावर अशी जुनी लेखन चूक प्रलंबित आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा.
ही कायदेशीर माहिती उपयुक्त वाटल्यास गरजू शेतकरी आणि जमीन मालकांसोबत नक्की शेअर करा. ☺🙏